सकारात्मकता व तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर शाळेला वेगळ्या उंचीवर न्या : आयुक्त रवींद्र ठाकरे

Date:

नागपूर : महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणारे अनेक जण आज प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. मी स्वत:ही महानरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मनपा शाळांमधील शिक्षकांनी मनात आणले तर काहीही अशक्य नाही. शिक्षकांची सकारात्मकता आणि काही करण्याची तीव्र इच्छा असेल तर आपल्या मनपाच्या शाळाही वेगळ्या उंचीवर नेता येतील, असे प्रतिपादन मनपा आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या २४ शाळांची ‘पायलट शाळा’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या ‘पायलट शाळां’मधील मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक व शिक्षकांसाठी वनामतीमध्ये २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारी (ता. २२) आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, प्रशिक्षण समनवयक विश्वास पांडे उपस्थित होते.

यावेळी आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, आज पैशाअभावी मनपातील विकास कामे रखडलेली आहेत. मात्र जी निरंतर विकासाची कामे आहेत त्यांना मात्र वेगळ्या पैशांची गरज नाही. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची, ती इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी व सकारात्मकता रुजविण्यासाठी या प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात आली आहे, असेही आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले. प्रत्येकच पालकाला आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे असे वाटते. प्रत्येक मुलाने शिक्षण घ्यावे हा त्याला अधिकार आहे. गरीब घरातील मुले चांगल्या शिक्षणापासून वंचीत राहू नयेत हा एकच ध्यास आहे. मनपाच्या शाळांमधून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे, यासाठी सुरूवातीला आपण २४ ‘पायलट शाळा’ सुरू केल्या. या शाळा पुढे इतर शाळांसाठी आदर्श ठरतील व नेतृत्व करतील यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असेही आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले.

मनपाच्या सर्व विभागामध्ये सकारात्मकतेची लाट यावी हा उद्देश आहे. प्रत्येकामध्ये सकारात्मकता निर्माण झाल्यास त्याचे प्रतिबिंब आपल्या कामात दिसून येते. महानगरपालिका किंवा सरकारी शाळांमधील शिक्षकांनी मनात आणल्यास काय करू शकतात याची प्रचिती यायची असेल तर सर्व शिक्षकांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या खराशी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट द्यावी, असेही ते म्हणाले. एकेकाळी दोन शिक्षकी असलेल्या या शाळेमध्ये पाचवीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. आज पाचवीपर्यंत कोणत्याही वर्गात प्रवेशासाठी जिल्हा परिषदेच्या या शाळेतील मुख्याध्यापकांकडे आमदारांचे पत्र जात आहेते, हे या शाळेतील शिक्षकांचे यश आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच्या मुलालाही इंग्रजीमध्ये संवाद साधता येतो, हे या शाळेत गेल्यानंतर दिसून येते. शिक्षकांनी इच्छाशक्ती व आपली क्षमता जाणून घेण्यासाठी या शाळेत एकदा भेट ‍द्यावी, असेही आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. आज आपल्या मनपाच्या शाळांनाही नेतृत्वाची आवश्यकता आहे. आपण एक ‘पायलट शाळा’ म्हणून ते नेतृत्व पुढे येउ ‍द्यावे. हे नेतृत्व दिल्यास प्रत्येक शाळा आदर्श ठरेल, असा विश्वासही आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी व्‍यक्त केला.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेमध्ये १५८ शाळा आहेत. यापैकी २४ शाळांची ‘पायलट शाळा’ उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या पायलट शाळा प्रत्येक झोनमधील मनपा शाळांचे नेतृत्व करणा-या शाळा आहेत. ‘पायलट शाळा’ उपक्रमाद्वारे पुढील वर्षीपर्यंत मनपाच्या शाळांमध्ये दीडपट पटसंख्या व दीडपट निकाल वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगतिले. ‘पायलट शाळां’च्या माध्यमातून प्रत्येक झोनमध्ये दर्जेदार शिक्षण देणा-या अनेक शाळा उभ्या राहाव्‍यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वैयक्तिक जडणघडणीसह कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले तर आभार साने गुरूजी माध्यमिक शाळेचे प्रभारी श्याम गहुकर यांनी मानले.

या विषयांवर प्रशिक्षण

पाचदिवसीय प्रशिक्षणामध्ये अपेक्षा आणि आदर्श शिक्षक, मुख्याध्यापकांची कर्तव्य, मी एक यशस्वी मुख्याध्यापक, माहितीचा अधिकार, सेवा हक्क अधिनियम, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, शिक्षणाचा अधिकार, प्रभावी शाळा व्‍यवस्थापन समिती व्‍यवस्थापन, मराठी भाषा कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, विज्ञान व गणित कौशल्य या विषयांवर तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अधिक वाचा : मनपाच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक संदेश देणारे नाटक राज्यस्तरावर

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related