नागपूर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. त्याअंतर्गत शहरातील मोठे बाजारही बंद करण्यात आले. या बाजारातील विक्रेत्यांना मनपातर्फे व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या जागांवरही फळे आणि भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे. अशा स्थितीत फळ व भाजी विक्रेत्यांनी एकाच जागेवर स्थायी दुकान न ठेवता निवासी भागामध्ये फिरून ती सेवा द्यावी. यासंदर्भात प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
कोविड-१९ च्या उपाययोजनेसंदर्भात मनपातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सोमवारी (ता.२०) आरोग्य समिती सभापतींनी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्या विशाखा बांते, सरीता कावरे, लीला हाथीबेड, सदस्य संजय बुर्रेवार, कमलेश चौधरी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने फळे आणि भाजी या जीवनावश्यक बाबींविषयी जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने लोकांच्या दारापर्यंत जाउन त्यांना फळे आणि भाजी उपलब्ध करून दिल्यास नागरिक घराबाहेर निघणार नाही. शहरातील आजची परिस्थिती पाहता ही बाब अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भातील त्रुट्या, अडथळे दूर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावे, असे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देश दिले.
याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले व काही लक्षणे आढळलेल्या कोरोना संशयीतांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या विलगीकरण कक्षातील लोकांकडूनही अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे विलगीकरणातील रुग्णांच्या दैनंदिन स्थितीबाबत वेळोवेळी आवश्यक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित अधिका-यांमार्फत दररोज पाठपुरावा करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येउन कार्य करणे आवश्यक आहे. महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त तुकराम मुंढे यांचया मार्गदर्शनात आरोग्य विभागातर्फे उत्तम कार्य केले जात आहेत. नगरसेवकांच्या सहकार्याने या सेवा कार्याची गती वाढविण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. प्रारंभी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शहरातील कोरोनाच्या स्थितीचा झोननिहाय आढावा घेतला. यावेळी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांनी शहरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि मनपातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनात्मक कार्याची माहिती दिली.
बुधवारी करणार नाग नदी स्वच्छतेची पाहणी
शहरातील नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनर्जीवनाचे कार्यही या काळात सुरू आहे. मनपातर्फे सुरू असलेल्या नाग नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता.२२) स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे अन्य सदस्यांसह दौरा करणार आहेत.