नागपुर :- महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे पालन न करणाऱ्या इमारतींवर कारवाई करून अशा इमारतींमधील पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा खंडित करा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.
गुरूवारी मनपा आयुक्त कार्यालयात सर्व विभागांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
अग्निशमन व आणीबाणी विभागातर्फे शहरातील ७८२ इमारतधारक व भोगवटदारांना इमारतीमधून दूर निघून जाण्यास नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र त्यापैकी ३७२ इमारतींनी अद्यापही काही उपाययोजना न केल्याने अशा इमारतीमधील पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी जलप्रदाय विभाग, ओसीडब्ल्यू व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ, एसएनडीएल च्या अधिकाऱ्यांना दिले.
रस्त्यांवरील खोदकाम शनिवारपर्यंत निकाली काढा
महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खोदकाम करताना महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मनपाच्या परवानगीशिवाय रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या विभागांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही यावेळी आयुक्त श्री. सिंह यांनी निर्देशित केले. रस्ते खोदकामासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासची सुद्धा परवानगी घेऊन त्या संबंधी रितसर पत्र सादर करण्यात यावे. याशिवाय रस्ते खोदकामासंर्भातील संपूर्ण प्रकरण येत्या शनिवारपर्यंत निकाली काढण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कळमना परिसरातील रेल्वेची सुरक्षा भिंत तुटल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे बांधकाम व ट्रॅकवरील स्वच्छतेबाबत त्वरित कारवाई करण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. रहिवाश्यांनी ये-जा करण्यासाठी कळमना ते नागपूर ट्रॅक लगतच्या भिंतीला भगदाड पाडले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ४५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यासंबंधीच्या अंदाजपत्रकाची प्रत मनपा आयुक्त कार्यालयाकडे पाठवून त्वरित कामाला सुरूवात करावी, असे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी निर्देशित केले.
प्रत्येक महिन्याला होणारी ही समन्वय बैठक विकास कामांच्या दृष्टीने आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व विभागप्रमुखांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.
अधिक वाचा : स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! – महापौर नंदा जिचकार यांचे आवाहन