पटना : सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वादावरून बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते, दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केले. ‘छिछोरे या सिनेमानंतर सुशांतने 7 सिनेमे साइन केले होते. मात्र सहा महिन्यांतच त्याच्या हातून हे सर्व सिनेमे काढून घेण्यात आलेत. याच कौर्याने एका प्रतिभावान कलाकाराचा बळी घेतला,’ असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
सुशांत सिंग राजपूत हा मुळचा बिहारचा होता. त्याच्यावर अन्याय करण्यात आला. सुशांतकडून सात सिनेमे काढून घेण्यात आले. तसेच त्याच्या काही फिल्मस प्रकाशित होऊ दिल्या नाहीत. याविरोधात मी तक्रार दाखल केली असून अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केल्याने सुशांतने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचा आरोप वकील सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.
तसेच दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले.
सुशांतची आत्महत्या
सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. यानंतर सोशल मिडीया आणि वृत्तवाहिन्यांवर बॉलिवूडमधील कृत्यांची चर्चा होऊ लागली. यावरून मुंबई पोलिसांनी ट्विट करत या अँगलनेही तपास करणार असल्याचे स्पष्ट केले.