नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्मित कविवर्य सुरेश भट सभागृहाला व्यावसायिक गटात उत्कृष्ट वास्तुचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयसीआय आणि अल्ट्रा टेक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा हा पुरस्कार मंगळवारी (ता.२६) वर्धा रोड येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता व शहर अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता शकील नियाजी, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा यांनी स्वीकारला.
मध्य भारतातील सर्वात मोठे सभागृह म्हणून सुरेश भट सभागृहाची ख्याती आहे. सुमारे दोन हजार आसनव्यवस्था असलेले हे एकमेव सभागृह आहे. या सभागृहाच्या तळघरात २०० कार, ६०० स्कूटर, ६०० सायकली एकाचवेळी उभ्या राहू शकतील, अशी वाहनतळ व्यवस्था आहे. तळमजल्यावर व्ही.आय.पी.पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण सभागृहात अद्ययावत ध्वनी व विद्युत व्यवस्था असून संपूर्ण सभागृह वातानुकूलित आहे.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण अभियंत्यांचे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा : सिंगिंग ऑडिशन में बच्चों ने दिखाया टैलेंट