नागपूर: पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरातील रहिवासी पंकज चंद्रकांत अंभोरे (३४) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंकजची पत्नी मनीषा (३२) आणि तिचा प्रियकर अरुण मिश्रा यांच्यामुळे पंकजने आत्महत्या केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.
पंकज प्रेमात अडसर ठरत असल्याने मनीषा आणि अरुण यांनी त्याची दगडाने ठेचून खून केल्याची चर्चा होती. खून केल्यानंतर अपघात झाल्याचा देखावा निर्माण करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला होता. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पंकज अंभोरे हे एका खासगी कंपनीत क्वॉलिटी सुपरवायझर होते. त्यांची काही वर्षांपूर्वी मनीषा हिच्यासोबत ओळख झाली होती. मनीषाच्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती.
तर, गुजरातमधील एका व्यापाऱ्याशी तिने दुसरे लग्न केले होते, असे सांगितले जात आहे. त्यानंतर पंकज आणि मनीषात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु, पंकजच्या नातेवाइकांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न करून एक फ्लॅट विकत घेऊन तेथे संसार थाटला. यादरम्यान मनीषाची मैत्री अरुण नावाच्या विवाहित युवकासोबत झाली. मनीषा आणि अरुण यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पंकज अडसर ठरत होता. अशा परिस्थितीत पंकजचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पंकजने स्वत:च्या डोक्यावर दगड मारून घेतल्याने त्याचा मृत्यू झाला, असे मनीषाने आपल्या बयाणात सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी ती आणि अरुणविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तरीसुद्धा मनीषाच्या बयाणावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, अशीही चर्चा सुरू आहे.
अधिक वाचा : कापड व्यापाऱ्याची पावणेदोन कोटींनी फसवणूक