नागपूर : राज्यात आरोग्य विभागाची क आणि ड संवर्गाची परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होत आहेत. मात्र, ओळखपत्रावर दुसऱ्या राज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. मात्र, ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याच्या बाबतीत घडलं असून त्याला तत्काळ दुरुस्त करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबरला तर गट-ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा आहे. यातील गट- क संवर्गातील २७३९ आणि गट- ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांचा समावेश आहे. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्रोतांमार्फत केली जाणार आहे. या परीक्षा देण्यासाठी जे ओळखपत्रावर जाहीर करण्यात आले आहेत, त्यावर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तर, काहींना नोएडाचे परीक्षा केंद्र दाखवण्यात आले आहे. ओळखपत्रांवर अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
केवळ एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केद्राची पत्ता चुकला होता, तो तत्काळ दुरुस्त करण्यात आला आहे, असे टोपे म्हणाले. तांत्रिक कारणांमुळे अशी चूक झाली असून दुरुस्तीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं ओळखपत्र इमेलवर देखील पाठवण्यात आलं असल्याचेही टोपे यांनी सांगितले.