नागपूर : सूचना आणि प्रसारण मंत्रालय, फिल्ड आउटरिच ब्यूरो, नागपूरद्वारा स्वच्छ भारत अभियान (शहरी) विशेष जनजागृती अभियानांतर्गत आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिका व कलादालनच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.
गुरूवारी (ता. २९) नागसेन विद्यालय कामठी रोड येथे स्वच्छता अभियानांसदर्भात जनजागृती करणारी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निबंध स्पर्धेमध्ये रा.बा.गो.गो. शाळेतील शाहिना फकरुद्दीन अंसारी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर याच शाळेतील रोशनी खरवार या विद्यार्थिनीने चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावर बाजी मारली. याशिवाय चित्रकला स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये बोरगाव हिंदी उच्च शाळेतील रोशन अंसारी या विद्यार्थ्याने चित्रकला स्पर्धेत तृतीय व याच शाळेतील शांती मुकेश शाहु या विद्यार्थिनीने निबंध स्पर्धेमध्ये तृतीय स्थान प्राप्त केले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळा निरीक्षक माया पजई, पुरूषोत्तम कळमकर, मनपा कलादालन प्रमुख सूर्यकांत मंगरुळकर, उषा तभाने, शारदा खंडारे, सीमा कालवानी, गीता पटेल आदींनी सहकार्य केले.
अधिक वाचा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा