सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा : समिती अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांचे निर्देश

प्रवीण भिसीकर

नागपुर :- महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची संपूर्ण माहिती येत्या पाच दिवसांत समितीपुढे सादर करा, असे निर्देश जुन्या निरुपयोगी बसेसच्या विल्हेवाटीसाठी गठीत तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले.

मनपाच्या चालविण्यायोग्य नसलेल्या २३० बसेसच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत समिती सदस्या अर्चना पाठक, सदस्य नितीन साठवणे, मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.

संपूर्ण शहरात सेवा देणा-या सुमारे २३० बसेस निरुपयोगी ठरल्या आहेत. शहरातील मनपाच्या विविध डेपोमध्ये या बसेस आहेत. या बसेसची सद्याची स्थिती दर्शविणारी विस्तृत माहिती, प्रत्येक डेपोमधील बसेसची संख्या, त्यांचे इंजीन नंबर आदी ३० जुलैपर्यंत समितीपुढे सादर करा, असे निर्देश समिती अध्यक्ष भिसीकर यांनी दिले. मनपाच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्यासाठी समितीने राज्य परिवहन महामंडळाला मागणी केली होती. मात्र महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शासकीय इन्शुरन्स कंपनीकडून ही ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

‘ऑफसेट व्हॅल्यू’, ई-टेंडरिंग आदी प्रक्रिया येत्या १५ दिवसांत तयार करून पुढील सभेत ते सादर करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही समिती अध्यक्ष भिसीकर यांनी व्यक्त केला.

शहरातील विविध भागात भंगारात निघालेल्या प्रत्येक बसेसची विस्तृत माहिती काढून त्यानंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. निरुपयोगी ठरलेल्या बसेसच्या विक्रीसंबंधीच्या प्रक्रियेमध्ये गोपनियता कायम राहावी, याकडे लक्ष देण्यात यावे, असे समिती सदस्य नितीन साठवणे यांनी सांगितले.

अधिक वाचा : मेट्रो मार्गालगतच्या घरांची जागा पदपथासाठी घेणार

Comments

comments