मुबंई: राज्यात १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले असले तरी पुन्हा रुग्ण वाढल्यास कडक लॉकडाऊन करण्यात येईल , असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे.
१५ ऑगस्टपासून रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लोकल प्रवास, हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, मॉल्स, मंगल कार्यालये यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमावावे लागले होते. अनेकांना प्राथमिक उपचारही मिळाले नाहीत त्यामुळे होलपट झाली होती.
राज्यात पहिल्यापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलेली दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकार सावध पावले टाकत आहे.
अजूनही रुग्णसंख्या समाधानकारक नसल्याने राज्यात पुन्हा तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.
ऑक्सिजनचा मोठा साठा लागेल
तिसरी लाट आणि तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे.
औद्योगिक क्षेत्राने अजून २०० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवण्याची खात्री दिली आहे. राज्यात एकूण ४५० पीएसए प्लांट्सची प्रस्तावित आहेत.
त्यापैकी १४१ प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ही सर्व क्षमता जरी वापरली, तरी १७०० ते २००० मेट्रिक टनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे.
तिसऱ्या लाटेत ३८०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागण्याची शक्यात आहे.
इतर राज्यांत देखील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे केंद्राकडून वेळेवर किती मदत मिळू शकेल, हे सांगता येणं शक्य नाही.’