नागपूर : नागपूर-गोवा-नागपूर अशी गाडी नियमित सुरू करण्याची मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी केली आहे. नागपूर तसेच विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, गोव्यासाठी थेट गाडी नाही. त्यामुळे आधी पुणे किंवा मुंबईला जाऊन गोवा गाठावे लागते. त्याऐवजी थेट गाडी सुरू झाली तर ते सोईचे होईल. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक स्तरावर अशी गाडी सुरू केली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे ही गाडी नियमित ठेवावी, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखीही काही मागण्या केल्या आहेत.
नागपूर- रायबेरली व्हाया कानपूर अशी गाडी सुरू करावी, त्यामुळे येथून कानपूर, लखनौ येथे जाणाऱ्यांची सोय होईल. ही मागणीही जुनी आहे. नागपूरवरून रतलामला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नागपूर- इंदूर गाडी उदययूर-रतलामपर्यंत विस्तारित केली तरी या प्रवाशांची सोय होईल.
अलीकडच्या काळात रेल्वेचे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. त्यातील अनेक अपघात रेल्वे रुळातील बिघाडामुळे झाले आहेत. त्यामुळे रुळांची देखभाल नियमित केली जावी, गाडीत सुरक्षा रक्षक नियमित असावे, मुंबई तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व गाड्यांना अजनी स्थानकावर थांबा द्यावा तसेच नागपूर-पुणे गरीब रथलाही अजनीला थांबा द्यावा. त्यामुळे नागपूर स्थानकावर प्रवाशांची गर्दी होणार नाही. जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर काम करतात, त्यांना त्यांच्या मूळ कामावर परत पाठवावे, अशाही मागण्या मध्य रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या शुक्ला यांनी केल्या आहेत.
अधिक वाचा : महापौर आपल्या दारी : गांधीबाग झोनमधील समस्या जाणून घेतल्या