नागपूर, ता. २९ : कोव्हिडमुळे जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाउन आहे. या काळात सिमेंट रोडचे बांधकामही बंद होते. पावसाळा सुरू होणार असल्याने अर्धवट अवस्थेतील सिमेंट रस्ते धोकादायक ठरू शकतात. प्रशासनाने तात्काळ सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे सुरू करा तसेच काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
नागपूर शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट रोड टप्पा १, २ आणि ३ च्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा शुक्रवारी (ता.२९) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत माजी महापौर व आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकुर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अविनाश भूतकर, मनोज गणवीर, ए.एस.मानकर, धनंजय मेंडुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ च्या कामाचा आढावा घेतला. यासंबंधी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सविस्तर माहिती सादर केली. टप्पा १ मधील बहुतांशी सिमेंट रोडची कामे पूर्ण झालेली आहेत. तर टप्पा २ मध्ये एकूण ५९ रस्त्यांचे काम प्रस्तावित असून त्यापैकी ५२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर तीन रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही माहिती अधीक्षक अभियंत्यांनी यावेळी दिले. टप्पा २ मधील अर्धवट कामे ताबडतोब येत्या सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. जी कामे सुरू झाली नाहीत त्या कंत्राटदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
टप्पा ३ मध्ये ३९ रस्त्यांचे बांधकाम प्रस्तावित असून १० रस्त्यांचे दोन्ही बाजूने तर आठ रस्त्यांचे एका बाजूने पीपीसी करण्यात आले आहे. यापैकी १२ रस्त्यांचे काम अद्याप सुरूच झाले नसल्याची माहिती अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सादर केली.
यावर महापौर संदीप जोशी यांनी सिमेंट रोडच्या टप्पा १, २ आणि ३ संदर्भात प्रशासनाचे अभिमत मुख्य अभियंत्यांनी येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले.