नागपूर, ता. १९ : शहरातील लॉकडाऊनचे नियम हळुहळू शिथिल होत असल्याने शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढत आहे. लॉकडाऊनमुळे शहरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. लवकरच पावसाळा सुरू होण्याचे संकेतही हवामान विभागातर्फे देण्यात आले आहेत. अशा स्थितीत अर्धवट बांधकाम झालेले रस्ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य जपून अर्धवट स्थितीतील रस्त्यांची सर्व कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी प्रशासनाला दिले.
मंगळवारी (ता.१९) कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्यासह स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संयुक्तरित्या शहरातील विविध ठिकाणच्या अपूर्णावस्थेतील रस्त्यांची पाहणी केली.
शहरातील अनेक ठिकाणच्या सिमेंट व डामरी रस्त्याच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. मात्र ती कामेही बंदच आहेत. याशिवाय जी कामे सुरू होती ती सुद्धा लॉकडाऊनमुळे बंदच आहेत. मागील दोन महिने नागरिक घरात होते. त्यामुळे या अपूर्णावस्थेतील मार्गांमुळे काही बाधा निर्माण झाली नाही. मात्र आता अनेक बाबींना परवानगी मिळाल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. अशा स्थितीत ही अपूर्ण कामे सुरू होणे अत्यावश्यक आहे. दत्तात्रय नगर येथील सिमेंट रोडचे अपूर्ण काम तसेच जरीपटका येथील दुर्गे पिठ गिरणी समोरील रस्त्याचेही काम अर्धवट आहे. शहरातील अशा अनेक ठिकाणी हिच स्थिती आहे. पावसाळा सुरू झाल्यास हे अपूर्ण बांधकाम झालेले रस्ते नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाद्वारे या अपूर्ण रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करून ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व भागातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांची यादी त्वरीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांना दिले.
Also Read- दिलासा देणारी बातमी । एकाच दिवसात कोरोनाचे ७४९ रुग्ण बरे होऊन घरी