भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. गेल्या 24 तासांत भारतात तर तब्बल दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात लशीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, तरीही भारतातील कोरोनाचे संक्रमण काही थांबायचे नाव घेत नाहीये. या साऱ्या पार्श्वभूमीवरच आता देशात लशीकरणाच्या अभियानामध्ये आणखी एका लशीला समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने रशियन लस स्फुटनिक व्ही ला मे अखेरपर्यंत आयात करण्याचा आदेश दिला आहे. भारताच्या आधी अर्जेंटीना, मेक्सिकोसहित 59 देशांनी रशियन लशीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे.
भारतात तिसऱ्या लशीला मंजूरी भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लशीकरणास सुरवात झाली आहे. भारतात निर्माण केली गेलेली कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना भारतात परवानगी देऊन लशीकरणास सुरवात करण्यात आली होती. आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. रशियात बनवली गेलेली स्फुटनिक व्ही ही लस भारतात मे अखेरीस येण्याची आशा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत भारतात आणखी पाच लशी उपलब्ध होतील. सध्या भारतात दोन लशी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचं उत्पादन होत आहे.
जुलैपासून होणार लशीचं उत्पादन भारतातील औषध नियंत्रक संस्था ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) रशियन लस स्फुटनिक व्हीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. डीसीजीआय कुठल्याही औषधाच्या वापराला मंजूरी देण्याआधी त्या औषधाच्या सुरक्षितेची आणि परिणामकारकतेची खात्री करते. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनला देखील मंजूरी देण्यासाठी अशाच प्रकारच्या परिक्षणातून जावं लागलं होतं. डॉ. रेड्डीज् लॅब्ससोबत स्फुटनिक व्ही यांचा करार झाला आहे. जून अथवा जुलैच्या अखेरीस भारतातील स्थानिक उत्पादन भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशात या रशीयन लशीव्यतिरिक्त आणखी पाच लशी लवकरच उपलब्ध करवून दिल्या जाणार आहेत. याचा अर्थ येत्या काही महिन्यांमध्ये स्फुटनिक व्हीच्या कमीतकमी 50 मिलीयन डोसचे उत्पादन सुरु होतील. तज्ज्ञांनी म्हटलंय की, स्फुटनिक 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असणाऱ्या लशींपैकी एक आहे.