नागपूर,ता. ३ : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात मनपाच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामांना गती द्या. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा आणि उर्वरीत कामांचा अहवाल पुढील १५ दिवसांत द्या, असे निर्देश दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले.
दक्षिण नागपुरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने सोमवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, राजेश मोहिते, रवींद्र देवतळे, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त राजेश कराडे, स्मिता काळे व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत आ. सुधाकर कोहळे यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत राजाबाक्षा हनुमान मंदिर व रमना मारोती हनुमान मंदिर येथील विकास कामांसंदर्भातील निविदा तातडीने काढण्यात याव्या, वंजारी नंगर ते अजन डी.पी. रोड संदर्भात मनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यासंदर्भातील अहवाल द्यावा, मनपाच्या बुधवार बाजार निर्मितीला गती द्यावी, जम्बोदीप नाला सौंदर्यीकरणाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, रिंगरोडवरील बेसा पॉवर स्टेशन समोरील कबाडीचे व म्हाळगी नगर चौकातील कोंबडी बाजाराचे, उदय नगर चौकातील चिकन शॉप अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, सावरबांधे ले-आऊटमधील पिण्याच्या पाण्याची टाकी जुन्या स्कीममधून तयार करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने नगरविकास विभाग, मुंबईकडे पाठविण्यात यावा, मानेवाडा घाटाचे उर्वरीत काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, दिघोरी घाटाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, दक्षिण नागपुरात असलेल्या बांबू उपवन वाचनालय उर्वरीत काम पूर्ण करून ते लोकांसाठी खुले करण्यात यावे, अमृत योजनेअंतर्गत दक्षिण नागपुरातील विविध भागात पाण्याच्या टाकीसाठी नेटवर्क तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.
सीमेंट रोडच्या अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. दक्षिण नागपुरातील मनपाअंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी वासीयांना पट्टे वाटपसंदर्भात स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अधिक वाचा : अग्निशमन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा!