नागपूर शहरातील झोपडपट्टीवासियांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी. तसेच या कामासाठी मनुष्यबळासह विशेष यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची तिसरी बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अंतर्गत जलवाहिन्या, मलवाहिकाच्या नियोजनासाठी आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमणे, प्राधिकरणाच्या जमीनचा उपयोग धोरण निश्चित करणे, प्राधिकरणाचे वित्तीय प्रारुपास तत्वतः मान्यता देऊन हा विषय कार्यकारी समितीकडे पाठविणे, सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणे, प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विकास योजनेतील रहिवासी भागात पायाभूत सुविधांसाठी रक्कम आकारणे आदी विविध विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटपाच्या कामास वेग द्यावा. त्यासाठी आवश्यक निधीसाठी राज्य शासनाकडून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच महानगर क्षेत्रातील गुंठेवारीमध्ये न बसणाऱ्या 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या अनधिकृत प्लॉटना मंजुरी देण्यासाठी नियम तयार करून त्यावर कार्यवाही सुरू करावी. तसेच महानगर प्राधिकरणाने तसेच म्हाडा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांची निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे.
यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी ग्रोथ सेंटरमधील बांधकामांना नियमानुकूल करून त्यावरील शुल्क माफक दरात आकारण्याची मागणी केली.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधीर पारवे, अनिल सोले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त त था जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा आदी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा : नागरिकांची विश्वासाहर्ता कायम ठेवून कर संकलन करा : संदीप जाधव