नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतर करणाऱ्या कामगारांना मदतीसाठी सरसावलेल्या अभिनेता सोनू सूदने आपला सामाजिक वसा दुसऱ्या लाटेतही कायम ठेवला आहे. ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मागील शनिवारी सोनूला कोरोनाची बाधा झाली होती व नुकताच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
नागपुरातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली व तिच्या फुप्फुसांमध्ये ८५ ते ९० टक्के संसर्ग झाला. सोनू सूदला यासंदर्भात ट्विटरवर संपर्क साधला असता त्वरित त्याने सूत्रे हलविली. अगोदर तिला नागपूर नागपुरातील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु तिची स्थिती पाहता तातडीने फुप्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर सोनू सूदने हैदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळात तिला एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था केली. त्या इस्पितळात ईसीएमओ म्हणजेच फुप्फुसांवरील ताण हटविण्यासाठी रक्त कृत्रिमपणे शरीरात टाकण्याची व्यवस्था आहे. संबंधित रुग्णाच्या वाचण्याची शक्यता २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व तरीदेखील एअरलिफ्ट करण्याची तयारी आहे अशी विचारणा केली. ती २५ वर्षांची तरुण मुलगी असून, ती नक्कीच यातून बाहेर येईल हा विश्वास असल्याने मी तिच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. तिच्यावर उपचार सुरू असून, लवकरच चांगली बातमी कळेल, असे सोनू सूदने सांगितले.