नागपूर : दारु पिऊन त्रास देत असल्याने सासऱ्याने मुलीच्या मदतीने जावायाची हत्या केली. ही खळबळजनक घटना यशोधरानगरमधील भिलगाव येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सासऱ्याला अटक केली आहे. दशरथ मरसकोल्हे (वय ६३), असे अटकेतील सासऱ्याचे तर इंदरलाल इनवाती (वय ४५), असे मृताचे नाव आहे. लक्ष्मीबाई (वय ४० तिन्ही मूळ रा. सीतापार,सिवनी), असे अन्य मारेकऱ्याचे नाव आहे. इंदरलाल मजुरी करीत होते. लक्ष्मीबाई व दशरथही मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी कामासाठी तिघेही नागपुरात आले. भिलगावमधील बुद्धनगर भागातील निर्माणाधाीन इमारतीच्या बाजूला झोपडीत ते राहातात. इंदरलाल याला दारुचे व्यवसन होते. दारु पिऊन तो लक्ष्मीबाई व दशरथला त्रास देत होता. त्याच्या सततच्या त्रासाला दोघेही कंटाळले. शुक्रवारी रात्री इंदरलाल दारु पिऊन आला. त्याने लक्ष्मीबाई व दशरथसोबत वाद घातला. संतप्त दशरथ व लक्ष्मीबाई या दोघांनी त्याला विटभट्टीजवळ नेले. विटांनी त्याच्या डोक्यावर वार केले. यात इंदरलाल याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान लक्ष्मीबाई व दशरथने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दशरथ याला अटक केली.
रेतीत लपविला मृतदेह
हत्या केल्यानंतर दोघांनी इंदरलाल याचा मृतदेह जवळीलच रेतीच्या ढिगाऱ्याखाली लपविला. शनिवारी सकाळी लक्ष्मीबाई यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये आली. दारु पिऊन पती खाली पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असे तिने पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायणवार यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांना या ठिकाणी रक्ताने माखलेल्या दोन विटा आढळल्या. याचदरम्यान डॉक्टरांनी प्राथमिक अहवाल दिला. डोक्यावर वार केल्याने इंदरलालचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मीबाई व दशरथची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनी इंदरलालची हत्या केल्याचे मान्य केले. पोलिसांनी दहशरथला अटक केली. रविवारी लक्ष्मीबाईला अटक करण्यात येईल.
अधिक वाचा : शांतीनगरमध्ये ३० वर्षीय युवकाची हत्या