नागपूर : माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व मोहन मते मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी‘ चा प्रयोग २२ डिसेंबरपासून रेशीमबाग मैदानावर सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात होणार आहे.
महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजीचे प्रयोग २२ डिसेंबरपासून ते २८ डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे महानाट्य सर्वांसाठी नि:शुल्क आहे. शिवशंभू शाहीर महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित या महानाट्यात संभाजींच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे आहे. रवी पटवर्धन औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. चिन्मय सत्यजीत यांनी या नाटकाला संगीत दिले असून गीत अॅड. महेंद्र महाडिक, दत्तात्रय सोनवणे, रोहित पंडित यांनी लिहिले आहे.
असा असेल रंगमंच
महानाट्यासाठी रेशीमबाग मैदानावर १३० फुटांचा भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे. ८० फूट लांब व ५५ फूट उंच किल्ल्याची सरकती व फिरती हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हत्ती, घोडे, उंट, बैलबंडी या नाटकात पाहायला मिळणार आहे. मराठे व मुघलांच्या तलवारीच्या खणखणात आणि तोफांच्या गडगडात व अग्नीबाणांच्या वर्षावात घनघोर रणसंग्राम, पालखी व रोज्यभिषेक सोहळा, १८ फूट जहाजाचा वापरकरून रोमांच उभे करणारी शंभूछत्रपतींची किल्ले जंजिरा मोहीम प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. २५० नाट्यकलावंत या महानाट्यात भूमिका साकारणार असल्याचे मोहन मते यांनी सांगितले.
अधिक वाचा : खासदार महोत्सवा’ने नागपूरला दिली नवी सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस