सीरमकडून कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज;DGCI ला औपचारिक परवानगी मागितली

नवी दिल्ली- सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने रविवारी कोविड-19 वरील लस ‘कोव्हिशिल्ड’च्या आपत्कालीन वापरासाठी भारतीय औषध महानियंत्रकाकडे (डीसीजीआय) औपचारिक परवानगी मागितली आहे. आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करणारी सीरम पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान उपचारासाठी गरज आणि व्यापकस्तरावरील जनहिताचा हवाला देत परवानगी मिळावी अशी सीरमने विनंती केल्याचे समजते. यापूर्वी शनिवारी अमेरिकन औषध उत्पादक कंपनी फायझरनेही भारतीय यूनिटने विकसित केलेल्या कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे अर्ज केला होता.

फायझरने त्यांच्या कोविड-19 लसीला ब्रिटन आणि बहारिनमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर भारतात अर्ज केला होता. एसआयआयने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) साथीने रविवारी देशातील विविध भागात ऑक्सफोर्डच्या कोविड-19 लसीच्या ‘कोविशिल्ड’ची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल घेतली.

एसआयआयच्या निवदेनाचा हवाला देताना माध्यमांनी म्हटले की, कंपनीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये चार डाटा समोर आले आहेत. ‘कोविशिल्ड’ लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेषतः गंभीर रुग्णांवर ही लस प्रभावकारी आहे. चारपैकी दोन चाचणी डाटा ब्रिटन तर एक-एक भारत आणि ब्राझीलशी संबंधित आहे.

लस 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा
दरम्यान, सीरम कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोविशिल्डची चाचणी 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरल्याचे म्हटले होते. लवकरच ही लस सर्वांना उपलब्ध होईल, असेही ते म्हणाल होते. एस्ट्राजेनेकाबरोबर 10 कोटी डोसचा करार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. जानेवारीपर्यंत किमान 100 मिलियन लस उपलब्ध होईल. तर फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत याचे शेकडो मिलियन डोस तयार होऊ शकतात.

दरम्यान, रशियाच्या “स्पुटनिक – 5′ या कोरोना प्रतिबंधक लशीच्या सुरक्षिततेची मानवी चाचणी पुण्यात पूर्ण झाली. पुण्यातील 17 स्वयंसेवकांना या अंतर्गत ही लस देण्यात आली. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, रशियातील गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर आँफ एपिडेमिओलॉजी अँण्ड मायक्रोबायोलॉजी, रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्यातर्फे “स्पुटनिक -5′ ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात येत आहे.

केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या अहवालानंतर रशियाच्या “स्पुटनिक -5′ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देशात सुरुवात झाली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यात तपासली जाते. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात लस किती सुरक्षित आहे, याची चाचणी मानवावर केली जाते. ही चाचणी पुण्यातील 17 स्वयंसेवकांवर नोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.