नव्या आठवड्याची झोकाने सुरुवात करत सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली विक्रमी घोडदौड कायम ठेवली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि तो ५२००० अंकांच्या पातळीवर गेला आहे. पहिल्यांदाचा सेन्सेक्सने ही विक्रमी पातळी गाठली आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढली आहे.
आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑटो या शेअरला चांगली मागणी आहे. सेन्सेक्सने सकाळी ९.३० वाजता ५२०४०.०० अंकांची विक्रमी पातळी गाठली. निफ्टीने १३२ अंकांची झेप घेत १५३०० अंकांपुढे गेला आहे.
अमेरिकेकडून आर्थिक पॅकेज वाढवण्याची शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली वॉशिंग्टनमधून होत आहेत. त्यातच जगभरात करोना रोखण्यासाठीची लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाचा भाव झपाट्याने वाढत असून इंधन मागणीत सुधारणा झाली आहे. हे सर्व संकेत अर्थव्यवस्था सावरत असल्याचे असून त्यामुळेच उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार गुंतवणूक केली असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. आशियाचा विचार करता जपान निक्केई १.३ टक्क्यांनी वधारला आहे. तर ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारात १ टक्क्यांची वाढ झाली आहे.
आजच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. त्यात इंडसइंड बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, मारुती, एसबीआय, ऍक्सिस बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर एचसीएल टेक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि ओएनजीसी या शेअरमध्ये घसरण झाली आहे.