करोनावर खबरदारी; उपराजधानीत जमावबंदी

करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीत सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू झाली. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.

Nagpur

नागपूर: करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीत सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू झाली. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी कलम १४४नुसार जमावबंदीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, व्यावसायिक प्रदर्शन व शिबिर, पर्यटन, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलन सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यात एका ठिकाणी पाचहून अधिक नागरिकांनी राहू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे.

करोनाची लागण होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनीही विशेष काळजी घेतली आहे. लग्नसमारंभ किंवा अंत्यविधी व त्यानंतर होणाऱ्या विधीसाठी हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी मॉल, जिम व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी चित्रपटगृहे, जिम, मॉल बंद आहेत किंवा नाही, याची झाडाझडती घेतली. याशिवाय लॉज व हॉटेल्सनाही विशेष काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. करोनाची लागण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून तसेच मानवी जीवितास निर्माण झालेली भीती, सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याने हे आदेश काढण्यात आले.

जमावबंदी आदेश लागू झाला असला तरी फूटपाथवरील चहाठेले, पानठेले व दुकानांमधील गर्दीमुळे धोका होऊ शकतो. मात्र, ही प्रतिष्ठाने बंद करणे किंवा दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू झाल्यानंतर आता महापालिका कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

मंदिरेही बंद

जिल्हा प्रशासनानेही अधिक खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : पोलिस आयुक्त

करोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागपूरकराने काळजी घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी करण्यात आली आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे.