जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही, डॉ. शाहिद जमील यांचा दावा

जुलैपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरणार नाही, डॉ. शाहिद जमील यांचा दावा

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचा वेग पहिल्या लाटेपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरण्यासाठी वेळ लागणार असून जुलैपूर्वी ही लाट जाणार नसल्याचा दावा प्रसिद्ध व्हायरलॉजिस्ट शाहिद जमील यांनी केला आहे.

डॉ. शाहिद जमील यांनी मंगळवारी एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना हा दावा केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला आहे, असं म्हणणं घाईचं होईल. कोरोनाच्या ग्राफनुसार कर्व्ह चपटा असेल. परंतु तो खालच्या दिशेने सहज जाणार नाही. त्यामुळे जुलैपर्यंत कोरोना विरोधातील लढा सुरू राहिल असं चित्रं आहे, असं सांगतानाच आपल्याला रोजच मोठ्या प्रमाणावरील कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागणार आहे, असं जमील यांनी सांगितलं.

डेथ रेटचा डेटा चुकीचा
पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत होती. यावेळीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या 96 हजार किंवा 97 हजार नाहीत. तर 4 लाखाहून अधिक आहे. त्यामुळे वेळही लागणार आहे, असं सांगतानाच माझ्या आकलनानुसार भारताचा डेट रेटचा डेटा पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोकांनी कोरोना फैलावला
यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग का फैलावला याचंही विवेचन केलं. लोकांनीच कोरोना संसर्ग फैलावला. त्यांनी कोरोना नियमांचं पालन केलं नाही, त्यामुळे कोरोना फैलावला. भारतातील लोकांनी प्रतिकारशक्ती विकसित केल्याचं आपण डिसेंबरपर्यंत मानत होतो. त्यामुळे लग्न सोहळे झाले आणि सुपर स्प्रेडिंगच्या घटना वाढल्या. कोरोना फैलावण्यासाठी धार्मिक कार्यक्रम आणि निवडणूक रॅलीही कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे केवळ दोन टक्के व्हॅक्सीन कव्हरेज होतं. व्हॅक्सीन सुरक्षित आहे आणि त्याचा दुष्परिणाम अत्यंत कमी आहे. त्यामुळे सर्वांनी व्हॅक्सिन घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.