नागपूर : दुसऱ्या लाटेचा धोका असताना कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लशीची क्लिनिकल ट्रायल नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मेडिकलमध्ये ५० व्यक्तींना ही लस टोचली. लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याने लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. सोमवारपासून (ता. २३) लशीची दुसरी मात्रा सुरू करण्यात येईल. यासाठी स्वयंसेवकांच्या रक्त व इतर सर्व चाचण्या करण्यात आल्या.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केलेल्या लशीची पहिली चाचणी यशस्वी झाली. पुण्यातील सिरम कंपनीच्या माध्यमातून कोविशिल्ड लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.
या लशीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली. नागपुरातील मेडिकलमध्ये वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस टोचण्याला येत्या २३ नोव्हेंबरला २८ दिवस पूर्ण होतील. यामुळे मेडिकलच्या केंद्रात स्क्रीनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील निरोगी असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस दिली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली. लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वॉर्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले गेले.
मेडिकल वैद्यकीय शैक्षणिक संस्था आहे. यामुळे येथे संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. सध्या डॉक्टर कोरोना नियंत्रणासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. विशेष असे की, रुग्णसेवेसोबत संशोधनासाठी अतिरिक्त वेळ देत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील लशीनंतर अँटिबॉडीच्या सकारात्मक परिणामाकडे लक्ष देण्यात येत आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचे मोलाचे योगदान या क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम, समन्वयक,
कोविडशिल्ड लस क्लिनिकल ट्रायल तसेच विभागाप्रमुख श्वसनरोग, मेडिकल-सुपर