नागपूर : उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाले. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यात शीघ्र प्रतिसाद पथक गठित करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात निदान झालेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला पाठविण्याची सूचनाही दिली. विशेष म्हणजे, मेयो, मेडिकलला या रोगावरील प्रभावी औषधही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म कीटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’ आजाराचे एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) या महिन्यात १३ रुग्ण आढळून आले. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्याचा विचार केल्यास आतापर्यंत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. कमी दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. याची दखल आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली. शासकीय व खासगी रुग्णालयांच्या वरिष्ठांची बैठक बोलविण्यात आली. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. जयस्वाल व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी रोगाचा आढावा घेतला. शीघ्र प्रतिसाद पथक तयार करून या रोगाची नोंद करण्याची सूचना इस्पितळांना देण्यात आल्या.
ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे; ज्याला चिगर म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. जिथे झाडीझुडूप किंवा गवत असते त्यावर हे चिगर असतात. गवत कापताना गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ते माणसाला चावतात. मानव ही आकस्मिक होस्ट आहे. हे चिगर माइट उंदरांना चावतात आणि तिथून रोग पसरतो. मोठी माइट चावत नाही आणि ती जमिनीवरच असते. चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असतात. साधारण ०.२ ते ०.४ मिलीमीटर आकाराचे. त्यामुळे ते डोळ्यांना दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखत पण नाही. त्यामुळे काही चावल्याचं भान राहत नाही.
आजाराची लक्षणे :
चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणं, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झालं असं समजण्यात येतं. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणं आणखीच कठीण होतं. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवलं तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.
हेही वाचा : सॅरिडॉन, डी कोल्डसह ३४३ औषधांवर बंदी घालणार