सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही शाळा सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येतात आणि आर्थिक मदत मागतात. ते खरंतर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागू शकतात. आपल्या शाळेला वा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे, जनप्रबोधिनीनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावडेकर म्हणाले.
जनप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या वाट्याबद्दल जावडेकरांनी कौतुक केले. अन्य शाळांसाठी हा आदर्श असल्याचे ते म्हणाले. “अनेक विद्यार्थी उपकृत राहून त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत,” जावडेकर म्हणाले.
आपल्या बालपणाची आठवण सांगताना जावडेकर म्हणाले ई-लर्निंग किंवा डिजिटल सुविधा नसतानाही शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्ये मिळत होती. परंतु आज सातवीतल्या मुलाला चौथीतली गणितं सोडवता येत नाहीत असा दाखला त्यांनी दिला. आम्ही लाखो मुलांची पाहणी करत असून प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील मुलांची काय स्थिती आहे ते कळवत आहोत असे जावडेकर म्हणाले. परंतु केवळ सरकारकडे या कामासाठी न बघता सगळ्या समाजानं एकत्र यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शाळांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागतंय याचा आढावा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घेण्यास सांगण्यात आला आहे, तसंच समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे ते म्हणाले. तसेच सध्याचा अभ्यासाचा बोजा ५० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार गांभीर्यानं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : Nagpur University to award 3% extra marks to ‘divyang’ students