नागपूर : कुख्यात संतोष आंबेकर याची रवींद्र उर्फ बाल्या गावंडे याच्या हत्येच्या आरोपातून अतिरक्त सत्र न्यायाधीश ए.एस. काझी यांनी निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आंबेकर याच्याविरूद्ध सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने त्याची मुक्तता करण्यात आली आहे. बाल्या गावंडे हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.
गावंडे याची त्याचा जवळचा साथीदार योगेश सावजी व इतर दोघांनी २२ जानेवारी २०१७ रोजी निघृण हत्या केली. बाल्या गावंडे याची संतोष आंबेकर, जय काळे आणि व्यावसायीक भागीदार महेश रसालकर यांनी कट कारस्थान रचून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. कारण गावंडे याने जय काळे याला सुमारे २० लाखाची खंडणी मागितल्याचा दावा करण्यात आला. काळे याच्याकडे तसे पत्र आढळून आले होते. तेव्हा जय काळे याने बाल्या गावंडे याच्याकडून जीवाला धोका असल्याने संतोष आंबेकर याच्या मदतीने गावंडे याची हत्या केली, असा आरोप करण्यात आला.
जय काळे याच्या मागणीवरून संतोष आंबेकर याने योगेश सावजी व त्याच्या साथीदारांना बाल्या गावंडेच्या हत्येची सुपारी दिली. त्यानुसार योगेश सावजी याने पार्टीच्या निमित्ताने बाल्या गावंडे याला घरी बोलावले. त्या पार्टीतच बाल्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी बाल्या गावंडे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी योगेश सावजी व इतरांच्या विरोधात हत्या, कट रचणे, हत्येचा कट घडवून आणणे अशा विविध आरोपांखाली गुन्हे दाखल केले. दरम्यान, गुन्हा दाखल होताच संतोष आंबेकर फरार झाला. परंतु, नंतर त्याने न्यायालयात शरणागती पत्करली. सरकारी पक्षाने संतोष आंबेकर याच्यासह इतर आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच साक्षीदार व पुरावे देखील दाखल केले.
संतोष आंबेकरच्या वतीने बाजू मांडताना अॅड. आर.के. तिवारी यांनी बाल्या गावंडे याची हत्या संतोषच्या सांगण्यवरून करण्यात आल्याचा कोणताही पुरावा सरकारी पक्षाला सादर करता आलेला नाही, असा दावा केला. केवळ संशयाच्या आधारे संतोष आंबेकरला या हत्याप्रकरणात गुंतवण्यात आले आहे. त्यानेच हत्येचा कट रचला अथवा तो स्वत: त्या पार्टीला हजर होता, त्याचे पुरावे देखील दाखल करण्यात आलेले नाहीत. याशिवाय बाल्या गावंडे याची हत्या करण्यासाठी योगेशला सुपारी देण्यात आल्याचेही पुरावे नाहीत. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कोणत्याही शस्त्राची संतोष आंबेकर याच्याकडून जप्ती करण्यात आलेली नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित या प्रकरणातील प्रत्येक पुरावा साखळी जोडणे आवश्यक आहे. परंतु, संतोष आंबेकर याच्या इशाऱ्याने हत्या झाल्याचा पुरावा सादर करता आलेला नाही. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून सत्र न्यायालयाने आंबेकर याची निर्देाष मुक्तता केली.
अधिक वाचा : नागपूर : क्षुल्लक कारणावरून तलवारीने वार; गंभीर जखमी