सांगली; लॉकडाऊनच्या भीतीपोटी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Date:

सांगली : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील बाजारपेठांत नागरिकांनी सोमवारी प्रचंड गर्दी केली होती. गर्दी कमी करण्याचे पोलिस आणि प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत होते. परंतु;  तरीही गर्दी हटत नसल्याने मिरजेत पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. दोन दिवसांत कडक लॉकडाऊन लागणार, या भीतीपोटी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु; सोमवारी जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, खानापूर, आटपाडी, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांत गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सांगली शहरात देखील खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

पुन्हा कडक लॉकडाऊन होण्याच्या भितीपोटी आणि मंगळवारी गुढीपाडवा असल्याने साहित्य खरेदीसाठी सर्वत्र दुकानात व बाजार पेठांत गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.

मिरजेतही  खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. दुकानासमोर गर्दी करूनये, विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. परंतु मिरज शहरात  रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.

प्रशासन व पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून गर्दी झाल्याने मिरज शहर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार पोलिस पथकासह कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यावेळी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. दरम्यान जिल्ह्यात देखील बाजार पेठांत तुफान गर्दी झाली होती.

प्रशासनाचे आदेश धाब्यावर

अत्यावश्क सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. परंतु  तरीही जिल्ह्यात काही ठिकाणी इतर दुकानेही उघडण्यात आली होती. त्या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी दुकाने बंद असल्याचे भासवून साहित्याची विक्री करण्यात येत होती.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related