नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित स्थळांना भेटी देण्यासाठी नागपूरहून समानता एक्सप्रेस गुरुवारी रवाना झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवली. समानता एक्सप्रेस या पयर्टन गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत तुळशीच्या माळ देऊन करण्यात आले.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे समानता एक्सप्रेस ही पर्यटन गाडी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडण्यात आली आहे. ही मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात आदी राज्यातून जाणार आहे. पर्यटनाचे पॅकेज ११ रात्री आणि १२ दिवसांचा आहे. त्यासाठी १० हजार ३९५ रुपये विना वातानुकूलित आणि १२ हजार ७०५ रुपये एसी थ्री टिअर आहे. ही गाडी १६ डब्यांची आहे. या पर्यटन गाडीच्या माध्यमातून प्रवाशांना चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ (वाराणसी), लुंबिनी, कुशीनगर (गोरखपूर), दीक्षाभूमी आणि परत मुंबईला आणले जाईल. या गाडीचे ८५ टक्के बुकिंग झाले आहे. नागपूहून ३५० प्रवासी बसले, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोमेश्वर कुमार यांनी दिली.
आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे एकाच डब्यात सर्व जाती-धर्माचे लोक प्रवास करतात. आयआरटीसीने या गाडीची व्यवस्था केली. अशाप्रकारे पहिल्यांदाच गाडी सोडण्यात येत आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
स्थळांना भेटी देण्याचा आनंद
गाडीने नागपुरातून निघालेले बहुतांश प्रवाशांना बौधगया, लुंबिनी, कुशीनगर, सारनाथ सारखे बुद्धाशी संबंधित स्थळे पाहण्याची पहिली वेळ होती. डॉ. आंबेडकर आणि बुद्ध यांच्याशी संबंधित स्थळ एकाचवेळी बघायला मिळत असल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. यासंदर्भात बोलताना वर्धा मार्गावरील पांजरी येथील पंचफुला डंभारे यांनी पहिल्यांदा ही स्थळ बघण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. यांना पर्यटन गाडीची माहिती वर्तमानपत्रातून मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.