भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आता भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मदतीला धावून आला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी आता तब्बल एक कोटी रुपये दान केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करण्यासाठी आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवण्यात यावेत यासाठी सचिनने हे दान दिले आहे. त्याने आपल्या योगदानाबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे. आताच्या परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होणे गरजेचे आहे. ही समस्या लक्षात घेऊन लोक पुढे सरसावत असल्याचे पाहून समाधान वाटते. २५० हून अधिक युवकांनी मिळून मिशन ऑक्सिजनची सुरुवात केली आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करणे आणि हे कॉन्सन्ट्रेटर्स देशभरातील रुग्णालयांना पुरवणे हा मिशन ऑक्सिजनचा हेतू आहे. मीसुद्धा माझ्या वतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सचिन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.
हेही वाचा : नागपूर; सोनू सूदची दरियादिली, नागपुरातील कोरोनाग्रस्त मुलगी हैदराबादला एअरलिफ्ट
सचिन तेंडुलकर प्रमाणेच अन्य क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले होते. तसेच ब्रेट लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे.