नागपूर : नागपूर मध्यवरती रेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाने बालमजुरांची तस्करी होत असल्यामुळे २६ बालकांना ताब्यात घेतले होते. या मुलांना आरपीएफच्या ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करताना ते उपाशी असल्याचे समजले. त्यांच्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन मागविण्यात आले होते. परंतु दोन घास खाल्ल्यानंतर मुलांनी भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन न करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी त्यातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भोजनाची तपासणी केली असता, ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले.
जनाहार रेस्टॉरंटमधून प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वाणिज्य विभागाने गंभीरतेने घेतली. बुधवारी जनाहार रेस्टॉरंटचे संचालन करणाऱ्या खासगी कंपनीला एक लाख रुपये दंड करण्यात आला. सोबतच भोजनाची दुर्गंधी येत असल्याचे कारण जाणून घेतले असता, जनाहारमधील ड्रेनेज लाईन फुटल्याचे आढळले. अशास्थितीत ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.
अधिक वाचा : नागपुर पुलिस क्राइम ब्रांच द्वारा चेन स्नैचर गिरफ्तार