नागपूर : राज्याचे माजी पोलिस महासंचालक तसेच एकेकाळी शहराचे पोलिस आयुक्त असलेले प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरी चोरी झाल्याने पोलिस यंत्रणा हादरली आहे. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याने पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
प्रबीरकुमार चक्रवर्ती धरमपेठेतील झेंडा चौकात राहतात. त्यांच्या प्रशस्त इमारतीत तिसऱ्या व चौथ्या माळ्यावर दोन मंदिरे आहेत. एक पंडित नेहमी पूजा करण्यासाठी त्यांच्याकडे येतो. रविवारी सकाळी पंडित पूजा करायला आले. मंदिरातील सोन्याची गणपतीची मूर्ती व अन्य साहित्य तेथे नसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी नोकरांकडे विचारणा केली. मात्र, कोणालाच याची माहिती नव्हती. त्यानंतर पंडिताने चक्रवर्ती यांना माहिती दिली. त्यांनी दोन्ही मंदिरांतील साहित्य तपासले. मंदिरातील सोन्याच्या मूर्तीसह सोन्याचे नाणे, चांदीची पेटी व चांदीची पादुकाही गायब असल्यासाचे त्यांना आढळले. सुरुवातीला त्यांनी घरातच या साहित्यांचा शोध घेतला. मात्र चोरीला गेल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सीताबर्डी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
नोकरावर संशय
चक्रवर्ती यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराने चार दिवसांपूर्वीच काम सोडले. त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आहे. नोकर हा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोराचा शोध सुरू केला आहे. लवकरच पोलिस त्याच्या शोधासाठी पश्चिम बंगालला जाणार आहे.
अधिक वाचा : नागपुरात पैशाच्या वादातून युवकावर हल्ला