नागपूर, ता. २२ : ‘कोरोना’चा अधिक ताकदीने प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २२) पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता सोमवार २३ तारखेपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार आयुक्तांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार आता नागपूर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सेवा वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस सह ऑटो, ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या टॅक्सी, खासगी ट्रॅव्हल्स आदींचा समावेश आहे.