रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ यंत्रणा कामाला लागली असली तरी एकच इंजेक्शन वेगवेगळ्या किमतींना मिळत असल्याने रोष व्यक्त होत आहे. प्रशासनाचा यावर वचक आहे की नाही, असा संतप्त सवाल नागपूरकरांकडून विचारला जाऊ लागला आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा केवळ कोव्हिड हॉस्पिटल आणि त्याला संलग्नित फार्मसीलाच करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले. प्रशासनाकडून या हॉस्पिटलला रेमडेसिव्हिर पुरविले जात आहे. रेमडेसिव्हिर हॉस्पिटलपर्यंत पोहोचावे, यासाठी हॉस्पिटलनुसार कोटा ठरवून आणि पुरवठादार निश्चित करण्यात आले आहे. या पुरवठादारांकडूनच हे इंजेक्शन हॉस्पिटलपर्यंत पोहोचत आहे. मात्र, एकाच इंजेक्शनसाठी वेगवेगळे पुरवठादार वेगवेगळे दर आकारत असल्याने गोंधळ उडत आहे. हॉस्पिटललाच वेगवेगळ्या दरात इंजेक्शन खरेदी करावे लागत असल्याने रुग्णांकडूनही हॉस्पिटल अधिकचे पैसे घेत असल्याने रुग्णांमध्येही संभ्रम वाढला आहे.
हा फरक का? १२ एप्रिल रोजी एका हॉस्पिटलने अॅस्पायर फार्मस्युटिकल्सकडून ४० रेमडेसिव्हिर विकत घेतले. एका इंजेक्शनची किंमत १३२० याप्रमाणे ४० इंजेक्शन ५२ हजार ८०० रुपयांचे झाले. याच हॉस्पिटलने १३ एप्रिल रोजी जैन मेडिकल एजन्सीकडून ५० इंजेक्शन घेण्यासाठी मागणीपत्र पाठविले. मात्र, या मेडिकलकडून हॉस्पिटलला देण्यात आलेल्या दरपत्रकात एका इंजेक्शनची किंमत ३ हजार रुपये असल्याचा उल्लेख होता. त्यामुळे एकाच इंजेक्शनची अशी वेगवेगळी किंमत का, असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला.
रुग्णांना १० टक्के अधिकची किंमत रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरविणाऱ्या यंत्रणेतच आता दोष असल्याचे पुढे आले. हॉस्पिटलला ज्या किमतीला इंजेक्शन पडले, त्यापेक्षा १० टक्के अधिकचे दर आकारून ते रुग्णाना दिले जाते. इंजेक्शन पुरविणारी यंत्रणाच सदोष असेल तर याचा थेट फटका रुग्णांना बसणार आहे. केवळ इंजेक्शन उपलब्ध करून प्रश्न सुटणार नाही तर दरांमध्येही पारदर्शकता आणणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.