नागपूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप’ यासारख्या योजनांमध्ये सहभागी असलेल्या गुंतवणुकदारांना अडचणी येणार नाहीत, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु, मिहान प्रकल्पात विमानांचे रडार बनवण्यासाठी प्रस्ताव देणाऱ्या थॅलेस रिलायन्स डिफेन्स सिस्टिम (टीआरडीएस) कंपनीला दोन महिन्यांपासून जमीनच मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे.
फ्रान्ससोबतच्या राफेल विमान खरेदी सौद्यावरून देशातील राजकारण तापले आहे. राफेल विमानासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन मिहानमधील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये करण्यात येते. विमानाच्या इंजिनला फटका बसू नये, यासाठी त्याचे कवच म्हणून डोअरची निर्मिती करण्यात येते. तसेच, फाल्कन विमानाच्या कॉकपिट निर्मितीचे कामही येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या शेजारीच रडारच्या उत्पादनासाठी टीडीआरएसने पाच एकर जमीन मागितली होती. मात्र, अद्याप त्यांना जमीन मिळालेली नाही.
टीआरडीएसने रडार निर्मितीसाठी मिहानमध्ये पाच एकर जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दिला. याबाबत १९ जून २०१८ रोजी बोर्ड ऑफ अप्रुव्हलची बैठक झाली. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने टीआरडीएसला ६ जुलै २०१८ रोजी परवाना मंजूर केला. या संपूर्ण प्रक्रियेला आता दोन महिने लोटले आहेत. मिहानच्या युनिट अप्रुव्हल कमिटीची बैठक २३ ऑगस्ट रोजी झाली. मात्र अद्याप त्याचे इतिवृत्त आलेले नाही.
अधिक वाचा : State Cabinet gives nod for safety wall along Mumbai-Nagpur Expressway