नागपूर : मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानक आणि लोखंडी पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मानस चौक ते जयस्तभ या दरम्यान सात पदरी रस्ता बांधण्यात येणार असून त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेस्थानकापुढील उड्डाण पुलासोबतच लोखंडी पुलाजवळील मंदिर आणि चौकातील पुतळा हटवावा लागेल, असा अहवाल यासंदर्भात अभ्यास करणारी कंपनी ‘इनिया’ ने महामेट्रोला दिला आहे. हा अहवाल व्हीएनआयटीकडे अंतिम अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे.
जयस्तंभ ते मानस चौकदरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने रेल्वेस्थानकापुढे उड्डाण पूल बांधला होता, परंतु यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात भरच पडली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोरील जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाजवळील मानस चौकात दररोज सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आता महापालिकेने हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला. हे काम महामेट्रोला देण्यात आले आहे. महामेट्रोने यासंदर्भातील अभ्यास करण्याचे काम इनिया कंपनीला दिले. कंपनीने त्यांचा अहवाल नुकताच सादर केला असून उड्डाण पूल तोडण्यासोबतच लोखंडी पुलाजवळील मंदिरही आणि चौकातील पुतळा हटवण्याची शिफारस केली आहे.
रस्त्यांच्या मधोमध पुतळा आणि मंदिरामुळे जुने मॉरिस कॉलेज तसेच कॉटन मार्केट चौकाकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा होतो , असे व्हीएनआयटीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
रेल्वेस्थानकासमोरील उड्डाण पूल तोडून त्याऐवजी सहा पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मॉल उभारण्यात येत आहे. तसेच वाहनतळ बांधण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या एसटीचे विभागीय कार्यालय आणि मध्यप्रदेश बसस्थानक तसेच मॉडेल स्कूलची जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने शहरातील अनेक अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ३० जुलै २०१८ ला त्रिमूर्तीनगर येथील दत्त मंदिरावर महापालिकेचे अधिकारी अतिक्रमण विरोधी कारवाई करताना नगरसेवक प्रवीण दटके व संदीप जोशी यांनी अडथळा निर्माण केला. त्यांनी विरोध करून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला परतवून लावले. महापालिकेचे पदाधिकारी असताना अशापद्धतीने कृत्य करणे कायद्याला अनुसरून नाही. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे व त्यांना नगरसेवक पदाची जबाबदारी पार पाडण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. त्यावर लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
रामझुल्यावरून येणारी वाहने मानस चौकाऐवजी थेट कस्तुरचंद पार्कजवळच्या चौकापर्यंत नेण्याची शिफारस केली आहे. यामुळे जयस्तंभ चौकातील वाहतूक सुरळीत होऊ शकेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
टेकडी गणेश मंदिरात येणारे भक्त, रेल्वे प्रवासी आणि इतर रहदारीला सुरळीत मार्ग देणारा हा प्रकल्प आहे. दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सभागृहात येणार आहे. हा प्रकल्प नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारा आणि वाहतूक कोंडी दूर करणारा आहे.
अधिक वाचा : जागतिक दिव्यांग दिन : फुटाळा परिसरात स्वच्छता अभियान