14 वर्षांच्या मुलीचे अश्लील फोटो अपलोड…! 1600 km जाऊन पोलिसांनी घातल्या बेड्या

आरोपी

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा चांगला वापर करण्याबरोबरच काहीजण त्यावरून अश्लील गोष्टींचाही प्रसार करत असतात. सोशल मीडियावर (Social Media) एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या नराधमाला आता अटक केलीय. पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

आपल्या अल्पवयीन बहिणीचे अश्लील फोटो कोणीतरी बनावट खाते तयार करून सोशल मीडियावर वायरल केले आहेत, असे सांगत काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

यावर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, तक्रार केलेल्या तरुणाच्या घराशेजारी नाजीम नावाच्या एकावर पोलिसांचा संशय होता. हा सर्व प्रकार दिल्लीतील रोहिणी येथील आहे.

नजीम हा अगोदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहत होता. त्या दरम्यान त्यानं या 14 वर्षीय मुलीला आपल्या जाळ्यात ओढत तिला फूस लावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी त्यानं मुलीचे अश्लील फोटोही काढले होते. घटनेनंतर हा परिसर सोडून तो दुसरीकडं राहायला गेला. त्यानंतर आता हे अश्लील फोटो व्हायरल झाल्यानं संबंधित मुलीच्या भावाला नजीमवर शंका आली. याबाबत त्यानं पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीडित मुलीनं आणि तिच्या भावानं पोलिसांना हे फोटो जवळपास चार वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे नजीमचे लोकेशन शोधले. त्याचे लोकेशन हैदराबाद शहराच्या जवळ दिसून आले, यानंतर पोलिसांचे एक पथक हैदराबादला रवाना झालं.

दिल्ली पोलिसांनी तेलंगणामधील विकाराबाद जिल्ह्यातील तंदूर परिसरातून आरोपी नाजिमला अटक केली. हैदराबादपासून जवळपास दीडशे किलोमीटर दूर अंतरावर त्याला अटक करण्यात आले. 27 वर्षीय नाजिम हा उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांना या आरोपीला पकडण्यासाठी 1600 किलोमीटर दूर जावं लागलं.