नागपूर :- मागील पाच-सहा वर्षांपासून रेल्वेच्या अडथळ्यामुळे प्रलंबित असलेला ट्रंक लाईनचा प्रश्न आता सुटला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी मंजुरी दिली असून आता लवकरच जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. उत्तर नागपुरातील राजनगरकडून येणारी ट्रंक लाईन बेझनबाग पाण्याच्या टाकीला जोडण्यासाठी रेल्वे लाईनखाली काम करायचे होते. गेल्या पाच वर्षांपासून यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा होते. यासाठी अनेक पत्रव्यवहार झाले. मात्र, रेल्वेने या कामासाठी मंजुरी प्रदान केलेली नव्हती.
अखेर नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाची निकड विषद केली. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची विनंती मान्य करीत या कामाला मंजुरी प्रदान केली. यामुळे आता या कामातील अडथळा दूर झाला आहे.या कार्याला आता सुरुवात झाली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी आज (ता.५) प्रगतीपथावर असलेल्या कार्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे सर्व वरिष्ठ अधिकारी, जयप्रकाश सहजरामानी, जगदीश वंजानी, राजेश बजाज, राजेश बटवानी आदी गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कामामुळे आता जरिपटक्यासह अर्ध्या उत्तर नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नागपुरातील जरिपटका, ठवरे कॉलनी, बेझनबाग, इंदोरा, लुंबिनी नगर, माया नगर, बाराखोली, चॉक्स कॉलनी, मेकोसाबाग यासह अनेक परिसराला याचा लाभ होणार असल्याचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.