आर फॅक्टर आठ राज्यात वाढतोय, कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही

नागपुरात बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ, मात्र मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही हे आठ राज्यातील आर फॅक्टर दर्शवत आहे अशी माहिती केंद्र सरकारने आज दिली. आठ राज्यातील वाढता आर फॅक्टर ही एक महत्वाची समस्या असल्याचे सरकार सांगत आहे.

केंद्र सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी इशारा दिला की, अजून ४४ जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा जास्त आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटमुळे आलेली दुसरी लाट अजून संपलेली नाही. याचबरोबर १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या चार आठवड्यात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. पॉल म्हणाले की, ‘डेल्टा व्हेरियंट ही मोठी समस्या आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. देशात अजूनही दुसरी लाट अस्तित्वात आहे.’ त्यांनी कोरोनाच्या आर फॅक्टर बाबत चिंता व्यक्त केली आहे. आर फॅक्टर जास्त असेल तर विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दर्शवते.

हीच ती आठ राज्य

पॉल यांनी सांगितले की, ‘कृपा करुन हे लक्षात ठेवा की आर फॅक्टर हा ०.६ किंवा त्याच्या खाली असावा लागतो. जर तो १ च्या पुढे असेल तर ती मोठी समस्या आहे. याचा अर्थ विषाणू पसरू पाहतो आहे.’ ते म्हणाले की, पॉझिटिव्हिटी रेट जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या गेल्या आठवड्यापेक्षा कमी आहे. पण, आता नव्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे.

आर फॅक्टर जास्त १ पेक्षा जास्त असलेल्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, तामिळनाडू, मिझोरम, कर्नाटक, पदुचेरी आणि केरळ यांचा समावेश आहे.

फक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात घसरण दिसत आहे. तर पश्चिम बंगाल, नागालँड, हरियाणा, गोवा, दिल्ली आणि झारखंडमध्ये आर फॅक्टर १ आहे.

आर फॅक्टरची वाढ म्हणजे रुग्ण संख्या वाढ

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, ‘ज्या वेळी आर फॅक्टर हा १ च्या वर असतो त्याचा अर्थ रुग्णसंख्यांचा कल वाढता असतो. तो नियंत्रणात आणण्याची गरज आहे.’ ते पुढे म्हणाले की, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा सरासरी आर फॅक्टर हा १.२ इतका आहे. याचा अर्थ एक बाधित व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींना बाधित करत आहे.

महामारीत आर फॅक्टरचे टार्गेट जर १ च्या खाली असले तर विषाणू पुढे जाऊन प्रसार करणे थांबवतो कारण तो लाट येण्याइतपत लोकांना बाधित करुन शकत नाही. भारतात आज ३० हजार ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ४२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल नव्या बाधितांचा आकडा ४० हजार १३४ इतका होता.