नागपूर – सकल मराठा समाजातर्फे संपूर्ण नागपुरात आज क्रांतीदिनी बंद पाळण्यात येत आहे. शहरातील शिवाजी स्मारकाजवळ संपूर्ण मराठा बांधव एकत्रित आले आहेत. यावेळी आंदोलक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.
सकाळी शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे महाआरती करण्यात आली. या महाआरती नंतर सकल मराठा समाजाच्या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. आरतीनंतर जय शिवाजी जय भवानीचे नारे देत मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, आंदोलक महिलांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढला नाहीं तर पुढचे आंदोलन आक्रमक होईल, असे मराठा आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टीने नागपुरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांगड्यांचा हार घालून मिरवणूक काढणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा हिसकावून घेत तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला. यावेळी आंदोलकांकडून चालू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते.
अधिक वाचा : आज महाराष्ट्र बंद: सकल मराठा समाजतर्फे आज नागपूर बंदचे आवाहन; या ठिकाणी बंद नाही