नागपूर: शहरातील सर्व खासगी बसेस शहराबाहेर थांबण्याच्या प्रक्रियेला महापालिकेद्वारे सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता चौकांमध्ये कुठेही बस थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या खासगी बससेवेला आळा बसेल. तसेच वाहतूक कोंडीही सुटण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी महापालिकेने प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून तिची पहिली बैठक गुरुवारी झाली.
शहरात खासगी बसेस, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, शाळेच्या बसेस, शहराच्या परिवहन विभागाच्या बसेस अशा चार प्रकारच्या बसेस वर्दळीच्या ठिकाणांवरून ये-जा करत असतात. या बसेसचे शहरात ठिकठिकाणी थांबे असल्याने त्या बराच काळ तेथे उभ्या असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. या कोंडीला रेखण्यासाठी नागपूर महापालिकेने नवे धोरण निश्चित केले आहे. याबाबत महापालिकेच्या ७ डिसेंबरच्या विशेष सभेत महापौर संदीप जोशी यांनी याबाबत निर्देश दिले होते.
शहराच्या बाहेर खासगी प्रवासी बसेसना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी उमरेड रोड व वर्धा रोड वरील नागपूर मेट्रो प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्र पाठवावे, असे निर्देश दटके यांनी दिले. या खासगी बसेससाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत धोरण निश्चित करावे. खासगी बसेसचे शहरात ज्याठिकाणी बुकिंग सेंटर आहे, त्याठिकाणी मनपाच्या परिवहन विभागामार्फत बसेस पुरविण्यात येईल का, यबाबातचा अहवाल पाहणी करून परिवहन विभागाने सादर करावा, महाराष्ट्र महापालिका अधिनियम अंतर्गत कायद्यामध्ये काही तरतुदी आहे का, याचीही पडताळणी करावी, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली.
यावेळी समिती सदस्य सुनील अग्रवाल, संदीप गवई, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे, वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता शकील नियाजी, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, योगेश लुंगे, यांच्यासह स्थावर विभागाचे संबंधित अधिकारी, पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढची बैठक ४ जानेवारीला
‘पोलिस वाहतूक विभाग यांच्याशी संपर्क साधून कायद्यानुसार कार्यवाही करावी. याबाबत सर्व अहवाल सात दिवसात तयार करून पुढील बैठकीस सादर करावा. पुढील बैठक ४ जानेवारी रोजी घेण्यात येईल’, असे प्रवीण दटके यांनी सांगितले. या बैठकीत वाहतूक पोलिस उपायुक्त, खासगी बसेसचे प्रतिनिधी, महापालिकेचे विधी अधिकारी यांनाही बोलविण्यात येईल. या बैठकीत खासगी बसेसच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाईल, असेही दटके यांनी स्पष्ट केले.