नागपूर : मुसळधार पावसामुळे विधिमंडळातील वीज गायब, मोबाइल टॉर्चच्या उजेडात आंदोलन

नागपूर : मुसळधार पावसामुळे विधिमंडळातील वीज गायब

नागपूर – नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू असून कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विधिमंडळाला वीजपुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या लाईटरूममध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.

वीज गेल्याने विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी मोबाइलचे फ्लॅश लाईटचा आधार घेत आंदोलन करावे लागत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनीती आखणे सुरू ठेवले होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकारचा हट्टीपणा या गोंधळाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वर्षानुवर्ष पावसाळी अधिवेशन मुंबईत होतंय, ते नागपुरात हलवण्याचा भाजपाने हट्टीपणा केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

अधिक वाचा : सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येण्याची गरज : अशोक चव्हाण