नागपुरात कॅसिनो हुक्का बारवर पोलिसांचा छापा;रेस्ट्रॉ संचालकासह पाच जणांना अटक

नागपूर – कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका कॅसिनो, हुक्का बार आणि रेस्ट्रॉ लाऊंजमध्ये छापा मारला. शनिवारी रात्री जेव्हा पोलीस तेथे धडकले त्यावेळी ६ मुली आणि २३ मुले झिंगाट झालेल्या अवस्थेत आढळली. त्यांना तसेच बार संचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे उत्तर नागपुरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती.

कामठी मार्गावर गेल्या अनेक दिवसापासून हे लाऊंज सुरू आहे. मोहित आणि साहिल गुप्ता हे दोघे बेकायदेशीररीत्या ते चालवतात. येथे जुगार खेळण्यासाठी कॅसिनो, मद्य आणि हुक्क्यासोबत नृत्याच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्यासाठी डीजे उपलब्ध असल्याने तरुण-तरुणीच्या येथे उड्या पडतात. शनिवारी, रविवारी तर तरुणाईकडून सॅटरडे नाईटच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जाते. शनिवारी रात्री असाच प्रकार सुरू असल्याची माहिती कळाल्याने परिमंडळ पाचचे उपायुक्त नीलोत्पल यांनी कपिलनगर पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवत जरीपटका पोलिसांचे पथक कारवाईसाठी पाठविले. पोलीस तेथे पोहचले. वरच्या माळ्यावर संचालकाने खास डान्स फ्लोअर बनवून घेतला होता. तेथे झिंगाट झालेल्या मुले-मुली डीजेच्या तालावर डान्स करीत होत्या. आतमध्ये धूरच धूर होता. बहुतांश जण नशेत टुन्न झालेले होते. पोलिसांनी हा धांगडधिंगा चालविणारा लाऊंज संचालक मोहित आणि साहिल गुप्ता तसेच डीजे जॉकी आणि हुक्का सर्व्ह करणारे दोन अशा पाच जणांना ताब्यात घेतले. तेथून कॅसिनो, ४९ हजारांचे हुक्का पॉट आणि फ्लेवर, १५ हजाराचे विदेशी मद्य तसेच बीअर जप्त करण्यात आली. मोहित आणि साहिल गुप्ता तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध कपिलनगर ठाण्यात कलम ६५ ई, ६८ दारूबंदी कायदा तसेच कोप्टा कायद्याचे कलम ४ आणि २३ अ अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार नितीन फटांगरे, एपीआय बजबलकर, पीएसआय देवकाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे कपिलनगर पोलीस ठाणे तसेच उत्तर नागपुरात पहाटेपर्यंत धावपळ बघायला मिळत होती.

पोलीस ठाण्यात नशा उतरली

दारूच्या नशेत आणि हुक्क्याच्या धुरात झिंगाट झालेल्या मुलामुलींना पोलिसांनी ठाण्यात आणल्याने त्यांची नशाच उतरली. २९ पैकी बहुतांश जण विद्यार्थी तर काही जण नुकतेच जॉबवर लागलेले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ते तोंड लपवू लागले. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क करून त्यांना ठाण्यात बोलवून घेतले, नंतर या मुलामुलींना समज देऊन सोडून देण्यात आले.