नागपूर : ओव्हरलोड वाहनातून रेती तस्करी करणाऱ्यांना पोलिसांकडूनच मदत केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोराडी पोलीस स्टेशनअंतर्गत समोर आला आहे. झोन क्रमांक ५ चे डीसीपी नीलोत्पल यांनीच सतर्कतेने या प्रकाराचा भंडाफोड केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांच्या कठोरतेनंतरही पोलीस कर्मचारी रेती तस्करांची मदत करणे सोडताना दिसत नाही. डीसीपी नीलाेत्पल यांना काेराडीच्या लाेणारा तलाव मार्गावर एमएच-३१,एफसी-५१५८ या क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी काेराडी पाेलीस स्टेशनला संपर्क करून पाेलीस निरीक्षकांना त्या ट्रकवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. निरीक्षकांनी संबंधित एएसआय व तीन पाेलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. या पथकाने संबंधित ट्रकला राेखले. ट्रक ओव्हरलाेड असल्याची बाब चालक व मालकाने कबूल केली.
कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी अतिरिक्त रेती रस्त्याच्या कडेला टाकण्याची इच्छा केली आणि पाेलीस कर्मचारी तयार हाेताच त्यांच्या उपस्थितीतच अतिरिक्त वाळू खाली करण्यात आली. वजन क्षमतेनुसार असल्याचे दाखविण्यासाठी ट्रक पाेलीस स्टेशनला नेण्यात आला. मात्र पाेलीस कर्मचाऱ्यांच्या अशा व्यवहाराचा सुगावा डीसीपी नीलाेत्पल यांना लागला हाेता. त्यामुळे ज्या ठिकाणी रेती खाली करण्यात आली, त्याच ठिकाणी दुसरे पथक दबा धरून लक्ष देत हाेते. पाेलीस स्टेशनमध्ये पाेहचताच नीलाेत्पल यांनी पाेलिसांचा भंडाफाेड केल्याने त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आराेपी पाेलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये एएसआय दिनेश सिंह, नायक शिपाई सुरेश मिश्रा, रवी युवनाते आणि विष्णू हेडे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे पाेलीस विभागात खळबळ उडाली आहे.
डीसीपी नीलाेत्पल यांनी पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत माहिती दिली. वाळू तस्करांविराेधात कारवाईबाबत आयुक्त कठाेर आहेत. त्यांनी नीलाेत्पल यांच्या शिफारशीवरून संबंधित पाेलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले. यानंतर वाळू तस्करी करणारे उमेश रामकृष्ण वनकर (३६) ओमनगर, जावेद बेग कलंदर बेग (३२) गौसिया मशीदजवळ व घाट मालकाविराेधात वाळू चाेरी व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करून ट्रक जप्त करण्यात आला. सूत्रानुसार आराेपींनी आरटीओ, महसूल विभाग व घाट कंत्राटदाराच्या मदतीने ओव्हरलाेड ट्रक भरून वाळू चाेरी करण्याची कबुली दिली आहे. अधिकाऱ्यांना लाखाे रुपये लाच दिल्याचेही मान्य केले आहे. पाेलिसांच्या कठाेरतेनंतरही आरटीओ व महसूल विभागाचे वाळू माफियांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळेच तस्करी व ओव्हरलाेडिंग थांबली नाही.