नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नागपूर मेट्रोच्या उद्धाटनाचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत. मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नागपूर मेट्रोने या आधीच खापरी रेल्वे स्टेशन ते साऊथ एअरपोर्ट दरम्यान मेट्रोची जॉय राईड सुरू केली होती. या मार्गावरील बहुतांश काम जमीन स्तरावरील असल्याने अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत मेट्रो सुरू झाली होती. मात्र, एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डी दरम्यानचा ७ किलोमीटरचा मेट्रो मार्ग एलिव्हेटेड असल्याने गेल्या ४ वर्षांपासून निर्माणाचे काम सातत्याने सुरू होते.
या मार्गावरील म्हणजेच रिच-१ च्या निर्माणाचे काम जवळ-जवळ पूर्ण झाल्यानंतर आता मेट्रोच्या संचालनाचे वेध लागले आहेत. मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७०कि़मी रिच-१ मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
खापरी ते सीताबर्डी या मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. यामध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जेपी नगर, छत्रपती स्टेशन, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर, सीताबर्डी मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. सीताबर्डी ते हिंगणा मार्गावरील काम देखील अंतिम टप्यात असल्याने या मार्गावर सुद्धा मेट्रो नजीकच्या काळात धावण्याची शक्यता वाढली आहे.
नागपूर मेट्रोच्या विस्तारित डीपीआरला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर केंद्राच्या मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया सुरू झाली असल्याने त्याचे देखील काम या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : पाच दिवसीय बुद्ध महोत्सवाचे थाटात उद्घाटन