कोरोना मुळे IPL २०२१ स्पर्धा अखेर स्थगित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना चं सावट स्पर्धेवर घोंगावत होतं. मात्र एक एक करत कोरोना ची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर करोनाची पडछाया होती. मात्र बायो बबलचं कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले होते. मात्र कोरोनाचं संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता टी २० विश्वचषकानंतर या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जातील असं बोललं जात आहे.
स्पर्धा सुरु झाल्यानंतर कोलकाता नाइटराइडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता आणि बंगळुरु दरम्यान होणार सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर कोलकाताच्या सामन्यानंतर दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात आला होता. त्यानंतर चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याचाही समावेश होतो. संपूर्ण संघ त्याच्या संपर्कात होता. त्यामुळे स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
दिल्लीत आज सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार होता. मात्र सामन्यापूर्वी हैदराबादचा वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे हा सामना देखील रद्द करण्यात आला.
परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा अर्ध्यात सोडली होती. तर आर. अश्विनने घरच्यांना करोनाची लागण झाल्याचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीही काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात करत संघात पुनरागमन केलं होतं.
IPL आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.