नागपूर: कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शासनाने घोषित नवीन मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने नागपूर शहरात जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकाने, इन सीटू बांधकाम कार्य आणि १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता.४) घेतला आहे. शहरातील नऊ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) व गांधीबाग, सतरंजीपुरा, आसीनगर आणि मंगळवारी हे चार प्रशासकीय मनपा झोन वगळता लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सर्व सहाही मनपा झोनसाठी हे आदेश लागू राहणार आहेत. मात्र संपूर्ण शहरातील खाजगी कार्यालयासह दारुची दुकाने, वाईन शॉप, पानठेले, शॉपींग मॉल, सलून, स्पा आदी सर्व बंदच राहणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपूर शहरामध्येही १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तिसरे लॉकडाऊन लागू करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना केवळ काही गोष्टींसाठीच शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यासाठीही त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नागपूर शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयामध्ये तीन महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी शिथिलता दिली आहे. शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, लकडगंज या सहा झोनमध्ये रहिवासी क्षेत्रातील, निवासी संकुलातील आणि रहिवासी परिसरातील फक्त होजियरी आणि स्टेशनरी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नमूद क्षेत्रातील इन सीटू बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी बांधकामस्थळी कामगारांच्या निवासाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय नमूद क्षेत्रातील शासकीय कार्यालये १० टक्के उपस्थितीसह सुरू करण्याबाबत सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व संबंधितांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही भागात दारूची दुकाने किंवा वाईन शॉप, पानठेले, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाबत कोणतिही परवानगी नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
शहरात कोविडची स्थिती लक्षात घेता संबंधित शिथिलता देण्याबाबत टप्प्याटप्प्याने पुढील आदेश जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुज्ञेय केलेल्या शिथिलतेबाबत नव्याने कोणतिही परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एस.ओ.पी. चे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Also Read- Coronavirus COVID-19 lockdown 3.0 begins on May 4: Here’s what’s allowed and what’s not