नागपूर : ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमातून नागरिक सामोरे जात असलेल्या अनेक समस्या समोर आला. यातूनच या समस्या सोडविण्यासाठी नवे काहीतरी शोधले पाहिजे या विचारातून ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’ची संकल्पना मांडण्यात आली. लोकसहभागातून समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होणार आहे. शहर विकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत १ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या हॅकाथॉनच्या निमित्ताने गुरुवारी (ता. २४) राजे रघुजी भोसले नगर भवन येथे इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. इंडक्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला महापौर नंदा जिचकार यांच्यासह नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त नितीन कापडणीस, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. प्रशांत कडू, केतन मोहीतकर, प्रवीण डाखोळे उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहराचा चौफेर विकास होतो आहे. मात्र, हा विकास शाश्वत असायला हवा. नागपूर महानगरपालिका नेमके काय करते, हेच अनेकांना माहिती नाही. नागरिकांना मुलभूत सोयी पुरविण्यासोबतच अनेक चांगली कामे नागपूर महानगरपालिका करीत असते. या कामांना तंत्रज्ञानाची आणि नवीन कल्पनांची जोड मिळाली तर सध्या होत असलेला विकास शाश्वत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करेल, असेही त्या म्हणाल्या.
यानंतर एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यामध्ये येत असलेल्या अडचणी आणि त्यावर कशाप्रकारे मात करता येऊ शकते या मुद्यांवर सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हॅकाथॉनविषयी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. प्रशांत कडू यांनी उत्तरे दिली. विविध विभागप्रमुखांनी केलेल्या सादरीकरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना संबंधित विभागप्रमुखांनी उत्तरे दिली. सदर इंडक्शन कार्यक्रमाला मनपातील विभागप्रमुखांसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात : महापौर नंदा जिचकार