‘या’ देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करायची विचित्र परंपरा

'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करायची विचित्र परंपरा

किर्गिस्तानमध्ये एका महिलेला जबरदस्ती लग्न करण्यासाठी किडनॅप केलं गेलं आणि नंतर काही दिवसांनी या महिलेचा मृतदेह एका गाडीत आढळून आला. या घटनेनंतर या देशातील या ‘परंपरे’विरोधात लोक आंदोलन करत आहेत. २७ वर्षीय एजादा केनेतबेकोवाला तीन लोकांनी जबरदस्ती कारमधून पळून नेलं होतं. रिपोर्टनुसार, यातील एका पुरूषाला या महिलेसोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने तिला किडनॅप केलं. या महिलेच्या किडनॅपिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ ट्रेन्ड झाल्यावरही पोलीस या कारला ट्रॅक करू शकले नाहीत आणि काही दिवसांनंतर या महिलेचा मृतदेह एका दुसऱ्या कारमध्ये आढळून आला. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये एका व्यक्तीला ही कार आढळून आली होती. त्यानेच पोलिसांना माहिती दिली. यानंतर अनेक महिला आणि पुरूष प्रदर्शन करण्यासाठी रस्त्यावर आले. ते या पंरपरेविरोधात आवाज उठवत प्रदर्शन करत होते. या महिलेसोबतच तरूण किडनॅपरचीही बॉडी सापडली आहे. तर एका दुसऱ्या किडनॅपरला पोलिसांनी अटक केलीये.

रिपोर्ट्सनुसार, ज्या तरूण किडनॅपर स्वत:ला संपवलं त्याने स्वत:ला आधी चाकूने जखमी केलं आणि नंतर जास्त रक्त वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यावर महिलेच्या परिवाराचीही प्रतिक्रिया आली आहे. एजादाच्या घरातील लोक म्हणाले की, ते या व्यक्तीला आधीपासून ओळखते होते. ही व्यक्ती एजादाच्या मागे लागली होती. ते म्हणाले की, त्यांनी आधीही या व्यक्तीला इशारा दिला होता की, मुलीला त्रास देऊ नको.

अनेक लोकांचं मत आहे की, लग्नासाठी महिलांचं किडनॅपिंगचं कल्चर किर्गिस्तानची एक प्राचीन परंपरा राहिली आहे. पण काही रिसर्चर्स याबाबत सांगतात की, ही कॉन्सेप्ट या सेंट्रल एशियन देशात गेल्या काही दशकांपासून सुरू आहे. दरम्यान २०१३ मध्ये ही प्रथा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पण नेहमीच अशा केसेसमधील दोषींसोबत नरमाईने वागलं जातं. सोबतच महिलांच्या मनातही सतत याची भीती असते.

किर्गिस्तानमध्ये परिवार आणि नातेवाईक एका निश्चित वयानंतर मुलांवर लग्नासाठी दबाव टाकतात. किर्दगिस्तानमध्ये गरीब तरूणांसाठी महिलांना किडनॅप करून घरी घेऊन येणं सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग मानलं जातं. यूनायटेड नेशन्सने सुद्धा किर्गिस्तानच्या परिस्थीतीवर चिंता जाहीर केली होती. यूएनच्या आकडेवारीनुसार, किर्गिस्तानमध्ये दर पाचपैकी एका महिलेचं लग्न जबरदस्ती किडनॅपिंगनंतरच होतं. आणि या देशातील अनेक वृद्ध याला आपली संस्कृती मानतात.