नागपूर : शहरात डेंग्यूचे वाढते थैमान लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमधूनच असल्याने या भागात स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूविषयीची नागरिकांच्या मनातील भीती काढून त्यांना या विषयी कशी काळजी घेता येईल व डेंग्यूचा प्रकोप वाढू नये यासाठी कोणत्या उपाययोजना घरीच करता येतील याविषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. यादृष्टीने झोनमध्ये वॉर्डनिहाय पाहणी करून नागरिकांच्या जनजागृतीकडे विशेष लक्ष द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत गुरूवारी (ता. २७) गांधीबाग व नेहरूनगर झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह गांधीबाग झोनच्या सभापती वंदन यंगटवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य समितीच्या सदस्य विशाखा बांते, नेहरूनगर झोनमध्ये झोनच्या सभापती रिता मुळे, सहायक आयुक्त राजेश कराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, नेहरूनगर झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. पवाने, गांधीबाग झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. मो. ख्वाजा मोईमुद्दीन उपस्थित होते.
बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी गांधीबाग व नेहरूनगर झोनमधील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती घेतली व त्याविषयी झोनस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गांधीबाग झोनमध्ये सद्यस्थितीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. झोनमध्ये शाळांसह घरोघरी जनजागृती व्हावी यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्याचे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले.
गणेशोत्सवादरम्यान झोनमध्ये विविध गणेश मंडपाजवळ डेंग्यू जनजागृतीविषयक स्टॉल्स लावण्यात आले. या स्टॉल्सवर नागरिकांना जनजागृती करणारे फलकही वितरीत करण्यात आले. शिवाय ज्या ठिकाणी साचलेले पाणी आहे, अशा ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले व काही नागरिकांनाही गप्पी मासे वितरीत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी गांधीबाग झोनमधील अधिकाऱ्यांनी दिली.
परिसरात स्वच्छता राखली जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. झोनमधील हनुमान मंदिरापुढे असलेल्या लाल शाळेच्या भिंतीपुढे अस्वच्छता असल्याची तक्रार असते. तो परिसर स्वच्छ करून भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर जनजागृती करणारे संदेश प्रसारीत करण्यात यावेत. याशिवाय परिसरातील कचरा राहत्या वस्त्यांच्या बाहेरच जमा करण्यात यावा व वेळोवेळी त्याची विल्हेवाट लावण्यात यावी. नागरिकांनाही डेंग्यूच्या बचावासाठी घरी व परिसरात स्वच्छता कायम राहिल याकडे लक्ष देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.
ताजबाग उर्ससाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करा
ताजबाग उर्सनिमित्त छोटा ताजबाग येथे मोठ्या संख्येत भाविक येत असतात. यानिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी नेहरूनगर झोनच्या बैठकीत दिले. ताजबाग उर्समध्ये संपूर्ण परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे. परिसरात स्वच्छता राखली जाईल व नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही, यासाठी दवाखान्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच झोनमधील दवाखान्यांमध्येही यादृष्टीने तयारी ठेवण्यात यावी, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.
अधिक वाचा : उपराजधानीत आयुर्वेदिक औषधात अॅलोपॅथीचे मिश्रण, डॉ. सुरेश पशिनेसह इतरांवर गुन्हा दाखल